
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुढील महिन्यात सांस्कृतिक कार्य संचलनालयामार्फत आयोजित होणाऱ्या बहुचर्चित राज्यनाट्य स्पर्धेसाठी अखेर जळगावचे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. नाट्यगृहाच्या उपलब्धतेसाठी गेले अनेक दिवस मागणी करत असलेल्या कलावंतांच्या पाठपुराव्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, शुक्रवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर त्यांनी उपलब्धतेची ग्वाही दिली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः नाट्यकर्मींसोबत नाट्यगृहाची पाहणी केली. नाट्यस्पर्धेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि भौतिक सुविधांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता मुकेश सोनवणे हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
नाट्यगृहाच्या पाहणीदरम्यान, नाट्यकर्मी रमेश भोळे, चिंतामण पाटील, वैभव मावळे, गौरव लवंगले, शंभू पाटील, अनिल मोरे, विशाल जाधव, हर्षल पाटील, अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर आणि नाट्यगृहाचे तांत्रिक साहाय्यक विजू पाटील आदी उपस्थित होते. कलावंतांनी आपली बाजू आणि अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
कलावंतांची तळमळ आणि मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नाट्यगृह तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे जळगावच्या नाट्यकर्मींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे राज्यनाट्य स्पर्धा आता जळगावात यशस्वीपणे पार पडेल.



