पुणे प्रतिनिधी । येथील सीरम इन्स्टीट्युटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड या कोरोनावर गुणकारी ठरणार्या लसीला देशभरात विविध ठिकाणी पाठविण्यास आज पहाटेपासून प्रारंभ झाला आहे. १६ जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरण सुरू होणार आहे.
आजपासून सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. आज पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे 5 वाजता विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी लसींचे डोस इतर शहरांमध्ये रवाना होण्यापूर्वी त्याची पूजा करण्यात आली. या पुजेचा मान पुणे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना मिळाला.
यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांचाही मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. पुणे विमानतळावरून लसीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.