जिल्ह्यातील निराधारांना ३४५ कोटी ५६ लाखांचे वितरण !

अर्थसहाय्य वितरणासाठी ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ मोहीमेची जोड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्ता,  निराधार, घटस्फोटित, वयोवृध्द घटकांना दर महिन्याला देण्यात येणाऱ्या आर्थ‍िक मदतीपोटी वर्षभरात ३४५ कोटी ५६ लाख ४४ हजार ४८० रूपयांची मदत करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना थेट अर्थसहाय्य वितरणासाठी ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ या मोहीमेची जोड देण्यात आल्याने मदत वाटपात पारदर्शकता व गतिमानता प्राप्त झाली आहे.  अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दिली आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य आदी योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असते.  जिल्ह्यात १ ऑगस्ट २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत एकूण ३ लाख ८७ हजार ९१५ लाभार्थ्यांना ३४५ कोटी ५६ लाख ४४ हजार ४८० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, एचआयव्ही, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,  ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे‌‌. या योजनेत ९०१७५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १०१ कोटी ८५ लाख १६ हजार ३०० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत ६५ वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या अथवा रूपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीना निवृत्ती वेतन देण्यात येत असते. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे‌‌. या योजनेतील १९००७१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २२० कोटी ९७ लाख ६३ हजार ९८० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत दारिद्रय रेषेखालील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती या योजनेत पात्र ठरतात. या योजनेत ८८७४६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १६ कोटी १६ लाख ८४ हजार २०० रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

 

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ७९ वर्षाखालील वयोगटातील विधवा या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. या योजनेत १७३७० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ३ कोटी ७९ लाख रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेत ६०३ लाभार्थ्यांना २३ लाख ६० हजार रूपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.  राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत ९५० लाभार्थ्याना २ कोटी ५४ लाख २० हजार रूपयांचा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८७ हजार ९१५ लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ मिळत आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना एक हजार रुपये देण्यात येत होते. जुलै महिन्यापासून आता दीड हजार रुपये अनुदान मिळत आहे.

Protected Content