तत्परतेने वीज जोडणी देण्यासोबत वीज बिल वसुलीला प्राधान्य द्या – सुहास रंगारी

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  ‘इझ ऑफ लिव्हिंग’ नुसार वीज ग्राहकांना वीज नियामक आयोगाने निश्चित केलेल्या माणंकानुसार उत्तम सेवा देणे,त्यांच्या तक्रारीचे तत्परतेने निराकरण करणे,नविन ग्राहकांना ताबडतोब वीज जोडणी देण्यासोबत शंभर टक्के वीज बिल वसुलीची जबाबदारीची स्विकारत वीज बिल वसुलीला गती देण्याचे निर्देश प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांनी दिले. तसेच वीज ग्राहकांनीही वेळेत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

विद्युत भवन अकोला येथे शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या महावितरणच्या तीनही जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंते अनिल वाकोडे, पवनकुमार कछोट, सुरेंद्र कटके, जीवन चव्हाण, सहाय्यक महाव्यवस्थापक मनिषकुमार भोपळे, कार्यकारी अभियंता शशांक पोंक्षे, सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, जयंत बानेरकर वरिष्ठ व्यवस्थापक गणेश भंडारी, प्रणाली विश्लेषक वर्षा भाटीया आणि सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्रादेशीक संचालक म्हणाले की,अकोला,बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्याची मार्च महिन्यात थकीत असलेली वीज बिलाची थकबाकी कमी झाली नाही,उलट एप्रिल ते ऑगष्ट या पाच महिन्यात त्या थकबाकीत दुपटीने वाढ झाली आहे.शिवाय या काळात परिमंडलात असलेल्या ३१ उपविभागापैकी अकारा उपविभागाची वीज बिल वसुली ही ६० टक्क्यापेक्षा कमी झाली आहे. सतरा उपविभागात केवळ ६० ते ७० टक्क्यादरम्यान वसुली झाली आहे आणि उर्वरीत तीन उपविभागात ७० ते ७५ टक्केच वसुली झाली आहे. परिमंडलात होत असलेल्या वीज बिल वसुलीबाबत प्रादेशीक संचालक यांनी चिंता व्यक्त करत वसुलीत हयगय करणाऱ्यावर निश्चित कारवाई करण्याचा गर्भीत इशारा यावेळी त्यांनी दिला.

शेतकऱ्यांना दिवसा विजेसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जिल्ह्यात जवळपास ४ हजार २५५ एकर जमिनीवर सोलार पार्क उभारून ८५३ मेगा वॅट वीज निर्मितीचे उध्दीष्ठ आहे.परिमंडलातील शेतकऱ्यांना या योजनेमुळे दिवसा वीज मिळणार आहे. त्यामुळे शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेला उध्दीष्ठानुसार शासकीय जागा मिळवून देणे,त्या जागेची पाहणी करून संयुक्त मोजणी करणे, वेगवेगळ्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे.तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून त्या जमीनीचे करार करून घेण्यासाठी तीनही जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते,कार्यकारी अभियंता स्थापत्य आणि विभागीय कार्यकारी अभियंते यांनी जबाबदारी घेत प्रयत्न करण्याचे निर्देश यावेळी प्रादेशीक संचालक यांनी दिले.

ग्राहकास वेठीस धरू नका

महावितरणमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली पाहिजे.नविन वीज जोडणीसाठी आलेल्या ग्राहकांना तत्परतेने वीज जोडणी देणे, तसेच वीज पुरवठा खंडिताशी संबंधीत तक्रारी बारा तासाच्या आत सोडविण्यात याव्यात. बिलींग हा महावितरणचा आत्मा असल्याने बिलींग बाबत असलेल्या तक्रारांची वेळेत सोडवणूक करत वीज ग्राहकांना शंभर टक्के अचूक बिल देण्याची जबाबदारी महावितरणची असल्याने त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश प्रादेशीक संचालक यांनी दिले.

महावितरणच्या डीजीटल सेवेसाठी ग्राहकांना प्रोत्साहीत करा

वीज बिल भरण्यापासुन तर तक्रार दाखल करण्यापर्यंतच्या महावितरणच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी असलेल्या या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कोणत्याच कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाईन वीज बिल भरतांना ग्राहकांना प्रत्येक वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा ५०० रूपयापर्यंतची सुट देण्यात आलेली आहे. ग्राहकांना याची माहिती देत त्यांना ऑनलाईन वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करण्यात यावेत.

उत्तम कामगीरीसाठी काही अधिकाऱ्यांचे कौतूक

ऑगष्ट महिन्यात वसुली आणि इतर पैलूंवर उत्तम कामगीरी केल्यामुळे प्रादेशीक संचालक यांनी अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट,कार्यकारी अभियंता अनिल उईके,विजकुमार कासट यांच्यासह उपकार्यकारी अभियंता  पातूर श्री रंगारी,अकोला ग्रामीण श्री अग्रवाल यांचे कौतूक केले.

Protected Content