१२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा; जिल्ह्यातील एका आमदारांचा समावेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण १२ आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेने केले असून यात जळगाव जिल्ह्यातील एका आमदारांचा समावेश आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी गतीमान होत असतांना आता कागदोपत्री लढाई देखील सुरू झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे आपल्याकडे आमदारांचे पाठबळ असल्याने खरी शिवसेना आमचीच असा एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. तर दुसरीकडे, उध्दव ठाकरे समर्थकांनी याचा प्रतिवाद केला आहे.

या पार्श्‍वभूमिवर, शिवसेनेतर्फे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार किंवा तो गट शिवसेना पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. हे निवेदन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, गटनेते अजय चौधरी यांच्यासह अन्य आमदारांची उपस्थिती होती.

या निवेदनात एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य ११ अशा एकूण १२ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या आमदारांमध्ये
संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर); संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम); तानाजी सावंत ( भूम-परंडा ); अब्दुल सत्तार (सिल्लोड); भरत गोगावले (महाड); प्रकाश सुर्वे (मागाठाणे); अनिल बाबर (सांगली); बालाजी किनीकर (अंबरनाथ); यामिनी जाधव (भायखळा); महेश शिंदे (कोरेगाव) यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यात चोपडा मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनाही अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे ही मागणी करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून आपण या धमक्यांना भीत नसल्याचे सांगितले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, घटनेच्या १० व्या परिशिष्टाप्रमाणे व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. एकनाथ शिंदे यांनीही स्वत:ला गटनेते आणि भरत गोगावले (यांना प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याबाबत झिरवळ यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रासोबत आपल्यासोबत असलेल्या आमदारांच्या स्वाक्षरी असलेला कागदही जोडण्यात आलाय.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: