यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसे गावात गौशाळा परिसरातील माती खोदकाम आणि वाहतुकीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. सरपंच गुणवंती सुरज पाटील यांनी ग्रामपंचायतचा कोणताही ठराव न घेता सावदा येथील एका व्यक्तीला माती नेण्याची परवानगी दिली, अशी माहिती समोर आली आहे. गावातील तरुण गोविंदा संजय कोळी यांनी ही बाब व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली.
यामुळे संतापलेल्या सरपंच पती सुरज मनोहर पाटील यांनी दारू पिऊन आपल्याला धमकावल्याचा आरोप गोविंदा कोळी यांनी करत फैजपूर तालुका यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, सुरज पाटील यांनीही गोविंदा कोळी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगत त्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. यामुळे हे प्रकरण आता परस्पर आरोप-प्रत्यारोपात अडकले आहे.
या सर्व घडामोडींमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे याप्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता नसल्यास आणि आवाज उठवणाऱ्यांना धमकावले जात असल्यास गावाच्या विकासात अडथळे येतील, अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
गावातील उपसरपंच अलकाबाई कोळी, ग्रामपंचायत सदस्य पुनम पाटील, तुषार भोई, सुदेश बाविस्कर, पांडुरंग कोळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सरपंच पती सुरज पाटील हे नेहमी दारूच्या नशेत ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करतात आणि पत्नीच्या पदाचा गैरफायदा घेत आहेत. पोलीस प्रशासन दोन्ही तक्रारींची चौकशी करत असून पुरावे गोळा करत आहे. पोलिसांनी गावातील नागरिकांना संयम राखण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.