Home क्राईम बैठकीतील वादाचे हाणामारीत रूपांतर ; सावदा शासकीय विश्रामगृहातील घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बैठकीतील वादाचे हाणामारीत रूपांतर ; सावदा शासकीय विश्रामगृहातील घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
1

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील शासकीय विश्रामगृहात बूथ लेव्हल एजंट (BLA) बैठकीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना समोर आली आहे. खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादात मारहाण, शिवीगाळ आणि धारदार वस्तूने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मनीष यशवंत भंगाळे (रा. गवत बाजार, सावदा) हे ११ जुलै रोजी दुपारी बूथ लेव्हल एजंट (BLA) बैठकीसाठी सावदा येथील शासकीय विश्रामगृहात गेले होते. बैठकीच्या मुख्य सभागृहात मोठी गर्दी असल्याने ते आपल्या सहकाऱ्यांसह बाजूच्या हॉलमध्ये बसले होते. याचवेळी खुर्चीवरून झालेल्या किरकोळ शाब्दिक वादातून वातावरण चिघळले. फिर्यादीनुसार, आरोपी मोईनखान मोहसीन खान याने शिवीगाळ करत तक्रारदाराची कॉलर पकडून मारहाण केली. तसेच वाहनाच्या चावीला असलेल्या धारदार वस्तूने त्यांच्या खांद्यावर व कानामागील भागावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये घबराट निर्माण झाली.

दरम्यान, गोंधळ सुरू असताना घटनास्थळी आलेल्या गणेश माळी यांनी संबंधितांना जाब विचारला असता त्यांच्यावरही लाकडी दांड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी तेथे आलेल्या सचिन बऱ्हाटे यांच्याशी दुसरा आरोपी सूरज उर्फ बद्री संतोष परदेशी याचा वाद झाला. या वादात सूरज परदेशी याने लाकडी दांड्याने सचिन बऱ्हाटे यांच्या छातीवर मारहाण केल्याचा, तर मोईनखान याने धारदार वस्तूने त्यांच्या हातावर वार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित एजाजखान फिरोजखान, विक्की वाघुळदे, सलीम पिंजारी तसेच इतर नागरिकांनी तातडीने मध्यस्थी करत संबंधितांना शांत केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात आरोपी मोईनखान मोहसीन खान आणि सूरज उर्फ बद्री संतोष परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सावदा पोलीस करीत असून, प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.


Protected Content

Play sound