Home Cities जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार चोरडिया यांचा विशेष गौरव 

जिल्हा पोलीस दलाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार चोरडिया यांचा विशेष गौरव 

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । न्यायालयीन कामकाजात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडून गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणारे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार चोरडिया यांचा जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. ‘मुद्देमाल सुपूर्दगी मोहीम’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रशंसनीय कामगिरीची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना विशेष प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले.  शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी आयोजित या भव्य कार्यक्रमाला राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूषविले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनीलकुमार चोरडिया यांनी न्यायालयात विविध क्लिष्ट आणि संवेदनशील गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि ठोसपणे मांडत अनेक प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेला कायदेशीर बळ मिळावे यासाठी त्यांनी तपासी अधिकारी आणि पैरवी अधिकाऱ्यांना वेळोवेळी अचूक कायदेशीर मार्गदर्शन केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये प्रभावी न्यायालयीन मांडणी होऊन दोषींना शिक्षा मिळवून देण्यास मदत झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले.

त्यांच्या याच उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष स्वाक्षरीयुक्त प्रशंसापत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन समर्पित सेवेला आणि न्यायव्यवस्थेतील प्रभावी योगदानाला मिळालेली पावती मानली जात आहे. या सन्मानानंतर कार्यक्रमात उपस्थित मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुनीलकुमार चोरडिया यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यामध्ये त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले.


Protected Content

Play sound