हैदराबाद वृत्तसंस्था । तेलंगणातील दिशा या तरूणीच्या भयंकर घटनेनंतर आंध्र प्रदेशाने दिशा कायदा संमत केला असून याच्या अंतर्गत बलात्काराच्या आरोपींना २१ दिवसात फासावर लटकावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळण्यात आले. तर नंतर तिचे मारेकरीदेखील एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा पास केला आहे. याअंतर्गत बलात्काराच्या घटनेनंतर २१ दिवसात दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर २१ दिवसाच्या आत खटल्याच्या सुनावणीबरोबरच दोषींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या विधेयकात भारतीय दंड संहीता ३५४ मध्ये संशोधनात्मक बदल करण्यात आले असून नवीन कलम ३५४ (ई) तयार करण्यात आले आहे. पोलिसांना अशा घटनांच्या प्रकरणांचा तपास अहवाल सात दिवसांच्या आत पूर्ण करून १४ दिवसांत न्यायालयाला द्यावा लागणार आहे. जेणेकरून २१ दिवसांच्या आत दोषींना फाशीची शिक्षा मिळेल. अशी तरतूद दिशा कायदा विधेयकात करण्यात आली आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर आंध्र प्रदेश हे बलात्कार्यांना फाशी देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.