हरिविठ्ठल नगरातून गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतुस जप्त

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगरात सोमवारी मध्यरात्री वादात २ पिस्तुल निघाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रामानंदनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी संयुक्त कारवाई करून हरिविठ्ठल नगरातील एका घरातून १५ हजार किमतीचेचगावठी पिस्तुल व ४ हजार रुपयांचे  चार पितळी जिवंत काडतुस असा १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणारे संशयित फरार झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरिविठ्ठल नगरातील बाजारपट्टा परिसरात राहणाऱ्या संतोष ज्ञानेश्वर  पाटील व योगेश ज्ञानेश्वर  पाटील  या दोघा भावंडांकडे दोन पिस्तुल गावठी पिस्तुल तसेच जिवंत काडतुसे असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली . त्यानुसार त्यांनी याबाबत पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना सूचना केल्या . रोहन यांनी रामानंदनगर पोलीस तसेच स्थानिक गुन्हेशाखेला कारवाईचे आदेश दिले .

माहितीनुसार बुधवारी सकाळी रामानंदनगर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर,  कर्मचारी विश्वनाथ गायकवाड, सतीश डोलारे , तुषार विसपुते, दिव्या छाडेकर , संतोष पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे राजेश मेढे संजय हिवरकर, प्रमोद लाडवंजारी यांनी हरिविठ्ठल नगर गाठले . कर्मचाऱ्यांनी माहितीनुसार संतोष पाटील यांच्या घरात तपासणी केली. तपासणीत घरात किचनमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाच्या वर एका बॉक्समध्ये गावठी पिस्तुल आढळले. त्यात चार जिवंत काडतुसेही मिळाले . तर दुसरी एक प्लास्टिकचे खेळणे असलेली बंदूकही मिळून आली .

चौकशीत गावठी पिस्तुल बाबतचा कुठलाही परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त केले असून या प्रकरणी संतोष ज्ञानेश्वर  पाटील व योगेश ज्ञानेश्वर  पाटील  या दोघां भावंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दोघेही फरार असून पोलीस दोघासह आणखी एक गावठी पिस्तुलाचाही शोध घेत आहे .

Protected Content