भुसावळात आज मध्यरात्रीपासून चार दिवसांचा जनता कर्फ्यू

भुसावळ । शहरात कोरोनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आज मध्यरात्रीपासून चार दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंताजनक बाब आहे. दररोज शहराच्या नवीन भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. यासंदर्भात प्रशासन उपाययोजना करीत आहे. तर पोलिसांतर्फे ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असले तरी नागरिक मात्र बेपर्वा असल्याचे चित्र आहे. शहरात भाजीपाला तसेच किराणा दुकानावर होणारी वाढती गर्दी, रस्त्यांवर फिरणारे नागरिक ही बाब कोरोनाच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी प्रतिबंधित क्षेत्रातील नगरसेवकांनी अत्यावश्यक सेवा पुरवण्याची मागणी केली. तर काही नगरसेवकांनी शहर पूर्णपणे बंद ठेवण्याची सूचना केली. यानंतर सर्वानुमते १७ तारखेपर्यंत शहर पूर्णपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स आणि दूध विक्री वगळता किराणा, भाजीपाला सह इतर सर्व पूर्णपणे बंद राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज रात्री पासूनच केली जाणार आहे.

या बैठकीला आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी कल्पना डहाळे, नगरसेवक प्रा. सुनील नेवे, उल्हास पगारे, नितीन धांडे, पिंटू कोठारी, दुर्गेश ठाकुर, रमेश मकासरे आदि नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content