लोकसभा निवडणूकीच्या निकालात वंचितची निराशाजनक कामगिरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुनज आघाडीला मविआत घेण्यासाठी अनेक दिवस प्रयत्न केले होते. वंचितचा मविआत समावेश झाला तर वंचितला फायदा होईलच, त्याचबरोबर महाविकास आघाडीची ताकदही वाढेल, या उद्देशाने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील नेत्यांनी प्रयत्न केले. मविआ नेत्यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि वंचितच्या इतर नेत्यांबरोबर अनेकवेळा चर्चा केल्या, बैठका केल्या. परंतु, या चर्चा निष्फळ ठरल्या. मविआने वंचितला राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी पाच जागा देण्याचे मान्य केलं होतं. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी याहून अधिक जागांची मागणी करत मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयाचा त्यांना, त्यांच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला फटका बसला आहे. या निवडणुकीत वंचितने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राज्यात २० हून अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र वंचितचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही. दुसऱ्या बाजूला वंचितच्या उमेदवारांमुळे राज्यातील मविआचे तीन उमेदवार पराभूत झाले आहेत.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अकोला मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे यांना ४,५४,९७२ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या अभय पाटलांना ४,१४,५५७ मते मिळाली आहेत. भाजपा उमेदवाराने या मतदारसंघात ४० हजार मतांनी आघाडी घेतली आहे. मात्र याच मतदारसंघात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना २,७५,४९० मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर किंवा अभय पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असते तर कदाचित त्यांनी सहज दोन लाखांच्या मतफरकाने विजय मिळवला असता.

अकोल्यापाठोपाठ हातकणंगले मतदारसंघातही वंचितच्या उमेदवारामुळे मविआचं नुकसान झालं आहे. हातकणंगलेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांना ४,८०,३४८ मतं मिळाली आहेत. तर, ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांना ४,६२,७३८ मतं मिळाली आहेत. धैर्यशील माने केवळ १७,६१० मतांनी आघाडीवर आहेत. मात्र याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ददगोंदा चवंगोंदा पाटील यांना ३० हजार मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचितची मविआबरोबर युती असती तर डी. सी. पाटलांना मिळालेली ३० हजार मविआच्या उमेदवाराला मिळून सत्यजीत पाटील विजयी होऊ शकले असते.

दरम्यान, बीड मतदारसंघातही अशी परिस्थिती आहे. या मतदारसंघात भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना ३,९३,८८४ मतं मिळाली आहेत. तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना ३,८२,८२४ मतं मिळाली आहेत. पंकजा मुंडे अवघ्या ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांना ३० हजार मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत वंचित मविआबरोबर असती तर या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला असता.

Protected Content