Home Cities रावेर डिगंबर महाराज चिनावळकर आषाढी पायी दिंडीचे ६ जून रोजी प्रस्थान होणार !

डिगंबर महाराज चिनावळकर आषाढी पायी दिंडीचे ६ जून रोजी प्रस्थान होणार !


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल आणि रावेर तालुक्यातील वारकरी परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या वै. डिंगंबर महाराज चिनावळकर यांच्या आषाढी पायी दिंडीचे प्रस्थान येत्या 6 जून रोजी खानापूर येथून होणार आहे. दिंडी समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी ही माहिती दिली. फैजपूर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत अध्यक्ष नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दिंडी परंपरेचे अधिपती दुर्गादास महाराज नेहते यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिंडीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली.

दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधांवर या बैठकीत विशेष लक्ष देण्यात आले. प्रवासादरम्यान आवश्यक वाहने सोबत असतील आणि मुक्कामाची व्यवस्था डिंगंबर महाराज मठात करण्यात येणार असल्याचे ठरले. यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहे.

ही दिंडी खानापूर येथून निघून चिनावळ येथील डिंगंबर महाराज समाधीस्थळी अभिषेक व भजनाने प्रारंभ करेल. त्यानंतर रोझोदा, खिरोडा, कलमोडा, बोरखेडा, हंबर्डी, भुसावळ, खडका, जामनेर, सिल्लोड, भोकरदन, जालना, बीड, बार्शी अशा विविध ठिकाणी मुक्काम करत सुमारे 500 किलोमीटरचा पायी प्रवास करून 23 दिवसांत पंढरपूरला पोहोचेल.

वै. डिंगंबर महाराज चिनावळकर यांनी ही दिंडी परंपरा सुरू केली होती, जी नंतर विठ्ठल महाराज हंबर्डीकर आणि वै. अरुण महाराज बोरखेडेकर यांनी पुढे नेली. विणेकरी भगवंत महाराज चौधरी (खानापूरकर) यांचे या परंपरेच्या पुनर्स्थापनेत अनमोल सहकार्य लाभले आहे.

दिंडीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी 5 जून रोजी संध्याकाळपर्यंत खानापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते आणि विणेकरी भगवंत महाराज चौधरी यांनी केले आहे. या दिंडीच्या यशस्वीतेसाठी अनिल नारखेडे, सुनील नारखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.


Protected Content

Play sound