धुळ्याचा जवान चंदू चव्हाण यांनी दिला राजीनामा

chandu chavan

धुळे प्रतिनिधी । पाकिस्तानच्या तावडीतून सुटून सुखरुप भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांनी लष्करातील अधिका-यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे कारण देत त्यांनी डी.एम.रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी एक व्हिडीओ देखील सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातत्याने छळ झाल्याने मी लष्करातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हापासून मी पाकिस्तानातून परतलो आहे, माझा सातत्याने छळ होत आहे. माझ्याकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे मी ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं चव्हाण यांनी सांगितले आहे.

लष्काराने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ‘चंदूच्या विरोधात जवळपास पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच याबाबतच त्याच्या गुन्ह्याखाली कारवाईही सुरु आहे. काही निवडणुकांमध्ये चंदू हे राजकीय पक्षांना समर्थनार्थ प्रचार केल्याचेही समोर आले होते’. याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. नुकतंच चंदू चव्हाण हे नशेत सापडले होते. याबाबत त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. मात्र गेल्या 3 ऑक्टोबर 2019 पासून सुट्टी न घेता ते युनिटमधून बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्यावर शिस्त भंग केल्याप्रकरणी कारवाई केली होती. सैन्यात अशाप्रकारे शिस्तभंग करण्याची परवानगी देत नाही, असेही सैन्याने सांगितले.

चंदू चव्हाण हे धुळ्यातील बोरविहीरी गावातील रहिवासी आहेत. चंदू चव्हाण हे 29 सप्टेंबर 2016 रोजी नजरचुकीमुळे भारत-पाकिस्तान सीमेवरील नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर तब्बल 3 महिने 21 दिवसांनी म्हणजेच 21 जानेवारी 2016 रोजी त्यांची सुटका झाली होती.

Protected Content