मुक्ताईनगरात धुम स्टाईल चोरट्यांचा धुमाकूळ

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे धूम स्टाईलने महिलांचे दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून असाच एक गुन्हा नुकताच नोंदविण्यात आला आहे.

मुक्ताईनगरसह तालुका आणि परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असून याची आगदी पार विधीमंडळात देखील चर्चा होत असते. प्रत्यक्षात मात्र काहीही कार्यवाही करण्यात न आल्यामुळे स्थानिक पातळीवर देखील अनेक लहान-मोठे गुन्हे सातत्याने घडत असतात.

या अनुषंगाने शहरातील संताजी नगरातील ५२ वर्षांच्या महिलेची मंगलपोत आणि सोन्यांचे मणी चोरीस गेले आहेत. दिनांक १३ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या घराबाहेर टाकलेली डाळ पाहण्यासाठी गेल्या असता लाल रंगाच्या मोटारसायकलीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगलपोत लांबवून पळ काढला. ही पोत एकूण ३० हजार रूपये रकमेची असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलिसांनी धुम स्टाईलने चोर्‍या करणार्‍या गुन्हेगारांना जेरबंद करतांनाच अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी आता करण्यात येत आहे.

Protected Content