ढेकू रोड परिसरात कुत्र्यांचा उच्छाद; लहान मुलांना केलं जातंय लक्ष्य

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ढेकू रोडस्थित भक्तीशक्ती स्मारक चौकात भटक्या कुत्र्यांनी ७ वर्षाच्या बालकाचे लचके तोडून त्यास जखमी केल्याची घटना घडली असून बालकास उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

ढेकू रोड भागातील रहिवाशी असलेल्या हर्षवर्धन गणेश पाटील हा बालक त्यांची शिकवणी आटोपून घराकडे येत असतांना ७ ते ८ भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला. यात बालक जखमी झाला असून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बालकाला धुळे येथे हलविण्यात आले आहे.

ढेकु रोड, पिंपळे रोड परिसरात या अगोदर देखील कुत्र्यांनी बरेच विद्यार्थी, महिला वर्ग, वृद्ध मंडळींना चावा घेतला असून या अगोदरसुद्धा नगरपरिषदला वेळोवेळी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी निवेदन दिले असून त्यावर अजून पावतो काही दखल घेतली गेली नाही. आता शाळा, कॉलेज व शिकवणी नियमित सुरू झाले असून त्या परिसरात लहान मूल नित्य नियमित वावरत असतात. तर पहाटे व सायंकाळी बरीच मंडळी फिरण्यासाठी त्या परिसरात जात असतात. ढेकू रोड परिसरातील रहिवासी संकुलामध्ये कुत्रे चोवीस तास मोकाट वावरत असतात. यापुढे काही गंभीर परिणाम होऊ नये; म्हणून वेळेच्या आतच नगरपरिषदने याबाबत कारवाई करून भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा. अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्वयंघोषित प्राणी मित्रांकडून कुत्र्यांना अभय –

ढेकू रोड भागातील काही स्वयंघोषित प्राणीमित्र या भटक्या कुत्र्यांना बिस्कीट किंवा अन्य पदार्थ खायला घालत असल्यामुळे ती कुत्री एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होतात. यात काही कुत्री ही पिसाळलेली असून नागरी भागात कुत्र्यांना जमवल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना त्रास द्यावा लागतो आहे. यात हेतुपुरस्कर त्रास देण्याच्या हेतू काही लोकांचा असल्याचे समोर आले आहे.

परिसराचे नगरसेवक शाम पाटील, विवेक पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, ॲड.यज्ञेश्वर पाटील यांनी अशा स्वयंघोषित प्राणीमित्रावर नगरपरिषदेच्या माध्यमातून कारवाई करून भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याचे आवाहन ढेकू रोड, पिंपळे रोड परिसरातील नागरिकांनी केले आहे.

Protected Content