दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थीनीला पालकमंत्र्यांतर्फे दुचाकी भेट

धरणगाव प्रतिनिधी । शेतात काबाडकष्ट करून दहावीच्या परिक्षेत प्रथम आलेल्या विशाखा विजय महाजन या विद्यार्थीनीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे स्कूटी ही दुचाकी भेट म्हणून देण्यात आली.

याबाबत वृत्त असे की, मोठा माळी वाड्यातील रहिवासी विशाखा विजय महाजन या विद्यार्थिनीने शेतात काम करून दहावीत ९६.२० टक्के मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तत्पूर्वी दहावीत तालुक्यात प्रथम येणार्‍या विद्यार्थ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दुचाकी भेट देण्याची घोषणा गत वर्षी केली होती. या वचनाची पूर्ती रविवारी धरणगाव तालुका शिवसेनेने पूर्ण केली.

येथील नगर परिषद व महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले जयंती दिनाच्या कार्यक्रमात धरणगाव तालुका शिवसेनेने दहावीत तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विशाखा विजय महाजन हिला स्कूटी भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी विशाखाच्या यशाचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, माजी नगराध्यक्षा उषा वाघ, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन, सर्व नगरसेवक, गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्‍हाडे, मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे यांची उपस्थिती होती.

Protected Content