Dharangaon धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक फाडल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले आहेत. यात धरणगाव येथे देखील स्वागतांचे फलक लावण्यात आले आहेत. यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात लावलेला एक फलक रात्री उशीरा फाडल्याचे दिसून आले.
ही माहिती मिळताच रात्रीच शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या सहकार्यांसह पोलीस स्थानक गाठले. याबाबत रात्री उशीरा अज्ञात समाजकंटकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात निलेश चौधरी म्हणाले की, धरणगावात आजवर टोकाचा राजकीय विरोध असून देखील कुणा नेत्याचे बॅनर फाडण्यात आलेले नाहीत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे फलक फाडण्याचा घृणास्पद प्रकार घडला असून या प्रकरणी पोलीस तपासातून तथ्य समोर येणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.