‘त्या’ प्रकरणात १३ जणांविरूध्द गुन्हा : वकिलाचाही समावेश !

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील प्रेमी युगलाच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यात एका वकिलाचाही समावेश आहे.

गेल्या आठवड्यात चोपडा येथे झालेल्या डबल मर्डरने प्रचंड खळबळ उडाली होती. या दोन्ही हत्या ऑनर किलींगचा प्रकार असल्याचे लागलीच उघडकीस आले होते. प्रारंभी यात मुलीच्या भावांना ताब्यात घेण्यात आले होते. यात दोन्ही खून घडल्यानंतर मुलीचा भाऊ
करण उर्फ कुणाल हा गावठी कट्टा घेऊन स्वतः पोलिसात हजर झाला होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. मात्र त्याच्या सोबत इतर देखील आरोपी असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले होते. यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान सात दिवसानंतर या प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ झाली असून यात तब्बल १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील लक्षणीय बाब म्हणजे यात तालुक्यातील गरताड येथील रहिवासी असणार्‍या ऍड. नितीन पाटील या वकिलाचाही समावेश आहे. गुन्हा दाखल होताच हा वकील फरार झाला असून त्याने अमळनेर कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्याचे समजते. तर याच प्रकरणात गावठी कट्टा पुरवणारा मध्य प्रदेशातील शेखर शिकलकर याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील उर्वरित ११ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असली तरी ऍड. पाटील आणि शेखर शिकलगर हे फरार झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांना जळगाव बाल सुधारगृहात पाठवले आहे. मुलीच्या आईसह नऊ जणांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content