धरणगाव प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ असणार्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या धरणगाव तालुक्यात ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून या सर्व ग्रामपंचायतींना विकासाच्या निधीसाठी कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
आज ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. या अनुषंगाने तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून अन्य आठ गावांमधील प्रत्येकी एक असे एकूण ८ वॉर्डातील उमेदवारांचीही अविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
धरणगाव तालुक्यातील पथराड खुर्द, पिंपळेसीम, लाडली, पष्टाणे खुर्द, हिंगोणे खुर्द, हिंगोणे बुद्रुक, चिंचपुरा, चमगाव व पिंपळे बुद्रुक या ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. तर आव्हाणी येथील वॉर्ड क्रमांक ३; बोरगाव बुद्रुक वॉर्ड क्रमांक ३; भवरखेडा वॉर्ड क्रमांक ३; जांभोरा वॉर्ड क्रमांक १; भोणे वॉर्ड क्रमांक १; मुसळी वॉर्ड १ आणि अहिरे खुर्द वॉर्ड क्रमांक २ येथील उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, बिनविरोध निवड झालेल्या ९ ग्रामपंचायतींचे सदस्य आणि ८ ग्रामपंचायत सदस्यांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, गावाच्या विकासासाठी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन धरणगाव तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना विकासाची कास धरलेली असून त्यांना भविष्यात सर्वतोपरी मदत करण्यात येईल.