गुरांसाठी रात्री उघडले न्यायालय !

धरणगाव प्रतिनिधी । गोशाळेत गुरे राहू द्यावी या मागणीसाठी येथील न्यायालयाने रात्री सुनावणी घेतली.

धरणगाव शहरात व पाळधी दूरक्षेत्र भागात शोध मोहीम राबवली होती. यात ३४ गोवंश गोऱ्हे आढळून आले होते. या गुरांची रवानगी गोशाळेत केली. मात्र काही दिवसांनी राजकीय दबावामुळे गोशाळेतील गोवंश मुळ मालकांना परत देण्यात यावे, असे पत्र गोशाळेला देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मुळ मालकांना गुरे द्यावीत अशा सूचना दिल्या.

दरम्यान श्रीपाद पांडे यांनी याबाबत धरणगाव न्यायालयात अॅड.राहुल पारेख यांच्यामार्फत एक याचिका दाखल केली व गो गोशाळेतच राहू देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. अॅड.राहुल पारेख रात्री दहा वाजता न्यायालयात गेले. गुरे मुळ मालकांना दिल्यास गुरांच्या जीवास धोका होऊ शकतो, हे न्यायालयाला सांगितले. न्या. एस.डी. सावरकर यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, गुरांची परिस्थिती व जप्तीबाबत वस्तूनिष्ठ अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश धरणगाव पोलिसांना दिले.

धरणगाव न्यायालयाने पहिल्यांदाच रात्री सुनावणी घेतल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे.

Protected Content