श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमीत्त श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापने निमीत्त दि. २१ जानेवारी २०२४ रविवार रोजी दुपारी ३ वा. श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळातर्फे सर्वसमावेशक भव्य शोभायात्रा आयोजीत केली आहे. श्री बालाजी मंडळाच्या विशेष सभेत श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न न्यायालयाने सोडविल्याबद्दल व भारताचे खंबीर पंतप्रधान श्री नरेन्द्रजी मोदी यांनी मंदिर बांधकाम व श्रीराम लल्लाच्या मूर्तीप्रतिष्ठापने बद्दल केलेल्या पाठपुराव्यां बद्दल अभिनंदन करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप रामू पाटील यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या विशेष
सभेत अनेक कारसेवकांची स्वप्नपूर्ती करणारा सोहळा दि. २२ ला संपन्न होणार आहे.

यामुळे परकीयांनी केलेला कलंक पुसून काढण्यासाठी सतत ५००वर्षे सुरु असलेला संघर्ष आता संपणार आहे, हिंदुत्वाचा ध्वज जगभर अभिमानाने फडकणार आहे याचा आनंदोत्सव साजराकरण्यासाठी श्रीबालाजी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, सडे रांगोळ्या शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी ध्वज उभारणी,शालेय विद्यार्थ्यांचे रामरक्षा पठण, महिला मंडळ व राजपुत युवक मंडळातर्फे भजन संध्या, दिपोत्सव इ. विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या भव्य शोभायात्रेत संपूर्ण गांवाचा सहभाग व्हावा म्हणून सर्व समाज पंच मंडळ, सर्व संघटना,सर्व शाळा, महाविद्यालये, विविध अध्यात्मिक पंथ, सर्व राजकीय पक्ष,किर्तनकार यांना पाचारण करण्यात आले आहे.

या शोभायात्रेसाठी मंडळाच्या वहनोत्सवासाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीवर प्रभु श्रीरामाची मुर्ती विराजमान केली जाईल तसेच सजीव देखावे उभे करून गावातील प्रमुख रस्त्यांवर सजावट व स्वागत कमानी उभ्या केल्या जातील. बॅन्ड पथकाच्या सहाय्याने रामधुन वाजविण्यात येणार असल्यामुळे डी जे.व लेझीम पथक यांचा समावेश करू नये असे ठरविण्यात आले आहे. या सभेत सर्वश्री गुलाबराव वाघ, भानुदास विसावे ,पंडीत चौधरी गुरुजी, माधवराव पाटील, जिवन बयस प्रशांत वाणी,किरण वाणी, प्रशांत केले, अरुण महाले, शाम भाटिया व अन्य विश्वस्तांनी चर्चेत भाग घेतला. वरील प्रमाणे सर्व उपक्रमांमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

Protected Content