ब्रेकींग : पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मुलाचा मृत्यू

धरणगाव/अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि, यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन (माळी ) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता. याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यामुळे त्याचा मृत्यू झाला.

अक्षय माळी हा पाचवीत शिकत असून तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे. मुलांनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: