धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष सलिम पटेल यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पालिकेत एकही नगरसेवक नसतांना पोटनिवडणुकीसाठी अनेक इच्छुक समोर आले आहेत.
आजच्या घडीला पालिका सभागृहात कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाहीय. परंतू विधानसभेतील पराभवानंतर पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. आज दुपारी राष्ट्रवादी कार्यालयात या संदर्भात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. आजच्या बैठकीत माजी नगरसेवक निलेश चौधरी, हाजी इब्राहीम, संभाजी धनगर,कोमल पेहलवान यांनी पोट निवडणूक लढण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. यावर चार तारखेला जळगाव जिल्हा राष्ट्रावादी कार्यालयात मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतींनंतर याबाबत निर्णय होणार आहे. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन या दोघांनी देखील निवडणूक लढण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.
माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांना पालिका राजकारणातील दांडगा अनुभव आहे. त्यांच्या धर्मपत्नी पुष्पाताई महाजन या देखील लोकनियुक्त नगराध्यक्ष राहून चुकलेल्या आहेत. त्यांच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली होती. परंतू विधानसभेला उमेदवारी मिळाल्यानंतर पुन्हा लगेच नगरपालिकेला पक्ष उमेदवारी देईल का? याबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे शहरात बहुसंख्य असलेल्या माळी समाजाचे नेते असल्यामुळे ज्ञानेश्वर महाजन हे आपल्या उमेदवारीचा दावा सांगू शकतात. आधी नगराध्यक्ष राहिले असल्यामुळे पालिकेचा गाडा कसा हाकायचा? याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. दुसरीकडे शहरात त्यांचे असलेले मोठे नातेगोते, त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. पालिकेत एकही सदस्य नसतानाही ज्ञानेश्वर महाजन उर्वरित कार्यकाळ राजकीय चातुर्यावर पालिकेचा कारभार चालवून दाखवू शकतात.
जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे यांना देखील पालिकेच्या कारभाराचा मोठा अनुभव आहे. अगदी पालिकेच्या कायद्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. पक्षाच्या पलीकडे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांसोबत आहेत. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे कारागृहात असतांनाही धरणगाव शहरातून त्यांना मताधिक्क्य मिळाले होते. त्यावेळी श्री. वाघमारे यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली होती. गुलाबराव देवकर यांच्या अत्यंत निकटवर्तीयांमध्ये वाघमारे गणले जातात. श्री. वाघमारे हे दोन वेळेस पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्या प्रभागातील विकासकामांची गतवेळी शहरात मोठी चर्चा झाली होती. गतवेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून सर्वात आधी वाघमारे यांनाच विचारणा झाली होती. त्यांनी त्यावेळी नकार दिला होता. परंतू यावेळी वाघमारे यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली आहे. वाघमारे यांनी उमेदवारी केल्यास इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते देखील त्यांना छुपी किंवा उघड मदत करू शकतात. नगरपालिका,तहसील, सरकारी दवाखाना अशा ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना ते मोठ्या प्रमाणात मदत करतात.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक निलेश चौधरी यांनी देखील उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. चौधरी हे युवा नेते आहेत. तर सामाजिक गणिताचा विचार करता, राष्ट्रवादीकडून त्यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो. पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक आहेत. आपल्या नगरसेवकपदाच्या काळात त्यांनी आपल्या प्रभागात चांगली विकास कामे केली होती. त्यामुळे श्री.चौधरी यांच्या नावाचा पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात. तसेच माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. गतवेळी सलीम पटेल यांना मिळालेल्या यशामुळे तीच खेळी राष्ट्रवादीने खेळल्यास फायदा होऊ शकतो,असाही अंदाज राष्ट्रवादीतून व्यक्त केला गेला. तर कोमल पेहलवान हे देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
आज झालेल्या बैठकीला ज्ञानेश्वर महाजन, निलेश चौधरी, देवरे आबा, डॉ.मिलिंद डहाळे, मोहन पाटील, नईम काजी, राजू शेख, नारायण चौधरी, रवी महाजन,सीताराम मराठे, संभाजी धनगर, कोमल पेहलवान यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.