
बीड (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका कथित व्हिडिओत ते पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा दावा भाजपाने केला आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर परळी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर हा व्हिडीओ एडीट करुन व्हायरल केल्याचे धनंजय यांनी म्हटले होते.
धनंजय मुंडे यांनी विडा येथे झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलतांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका केल्याचा आरोप आहे. या टिकेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तर परळी येथील समारोपाच्या सभेत या विषयावर आक्रमक पवित्रा घेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर कडाडून हल्ला चढवला होता.यानंतर पंकजा मुंडे यांना भोवळ आली होती. दरम्यान, धनंजय मुंडेंनी एक फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे, माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियात व्हायरल होणारी क्लिप एडिट करुन वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यात यावी. अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आतार ठेवावा, निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही विनंती आहे.