मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा| धोका होऊ नये यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने ऐनवेळी निर्णय घेत मतांच्या कोट्यात वाढ केली, त्यामुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे आमच्या तिन्ही जागा येणार आणि एक संजय जाणार हे निश्चित असल्याचे माजी आ.अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
राज्यसभेसाठी मतदानाचा धोका टाळण्यासाठी ऐनवेळी सर्वात अगोदर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नंतर शिवसेनेचे मतदान अशी व्यूहरचनेसह मतदानाच्या कोट्यात वाढ करीत मतदानाला सुरुवात झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या कोट्यात प्रत्येकि दोन मते वाढवली. त्यामुळे शिवसेनेचे पहिल्या पसंतीचे चार मते कमी होणार आहेत. त्यामुळे अनायसे भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली असून एक संजय जाणार हे निश्चित असल्याचेच चित्र दिसून येत आहे.
देशभरात राज्यसभेच्या मुदत संपूष्टात येत असलेल्या ५७ जागांसाठी ३१ मे रोजी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी ४१ जागांवर बिनविरोध सदस्य निवडण्यात आले. उर्वरित १६ जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. राज्यात देखील ६ जागांसाठी ७ उमेदवारांसाठी मतदान सुरु झाले आहे. यात सकाळी १० वाजेपर्यंत भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २० तर कॉंग्रेसच्या १० असे ५० आमदारांनी मतदान केले. यात मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश होता.
राष्ट्रवादीचे आ.सुनील तटकरे, जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे अशोक चव्हाण तर शिवसेनेचे सुनील प्रभू हे पोलिंग एजंट आहेत.
कोणीतरी संजय जाणार
तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी भाजपचे तिन्ही उमेदवार १०० टक्के विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला असून आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही. मात्र महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसा या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की असल्याचेही बोंडे यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.