मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृ्त्वातील महायुतीच्या हाराकिरीवर राजधानी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी सायंकाळी राजधानीत जाऊन या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत तत्पूर्वी, भाजप नेते विनोद तावडे यांनी अमित शहा यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महायुतीच्या निवडणुकीतील या निराशाजनक कामगिरीमुळे महाराष्ट्र भाजपची झोप उडाली आहे. विशेषतः भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही ही गोष्ट गंभीरतेने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा उडवूनही महायुतीला पराभवाचे तोंड पहावे लागले. यामुळे पक्ष पातळीवर मोठे विचारमंथन सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची तयारी स्वीकारत राजीनाम्याची तयारी दर्शवल्यामुळे पक्ष संघटनेत मोठी खळबळ माजली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर अमित शहा यांनी त्यांना फोन करून दिल्लीला बोलावले आहे. पण तत्पूर्वीच भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. यामुळे महाराष्ट्र भाजपत मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने विनोद तावडे यांच्यावर ज्या ज्या राज्यांची जबाबदारी दिली होती, तिथे त्यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. या अंगानेही तावडे व शहा यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे.
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस गुरुवारी सायंकाळी राजधानी दिल्लीत पोहोचत आहेत. ते तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भेट घेतील. या भेटीत ते या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांशी महाराष्ट्राच्या व्युहरचनेत कुठे चूक झाली किंवा भविष्यात पक्षाने आपल्या रणनीतीत कोणते बदल केले पाहिजेत? या मुद्यावर चर्चा करतील. विशेषतः पक्ष संघटनेतील संभाव्य बदलांवरही या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी फडणवीस मुंबईहून नागपूरला पोहोचले. ते तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.