राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा-देवेंद्र फडणवीस

 

नागपूर-  ‘राज्यातील कोरोना संकट वाढले आहे. मृत्यूदरही वाढत आहे. या संकटाचा सामना करण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा सुरू केला आहे,’ असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे

पूर्व विदर्भातील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

“राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. कोरोनामुळे मृत्यूदरही वाढत आहे. अशावेळी राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र, याऐवजी राज्यातील मंत्री आणि अधिकारी कुणाला कुठे आणि कशी पोस्टिंग मिळेल, यामध्ये गुंग झाले आहेत. कोरोनाच्या काळात बदल्या करणे इतके महत्त्वाचे आहे का?, एक वर्ष बदल्या झाल्या नसत्या तर काय फरक पडला असता?, असा सवाल करत राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झाला आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यात १८ ते २० लाख कर्मचारी आहेत. मात्र, ही संख्या ७ ते ८ लाख एवढी जरी पकडली आणि त्यातील १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आकडा जरी काढला तरी ही संख्या खूप मोठी होते. कोरोनाच्या काळात १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेणे हे चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बदल्यांचा खर्च वाढविण्याची गरज काय?

याचबरोबर, बदली केल्यावर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला भत्ता द्यावा लागतो. त्यासाठी सुमारे ५०० कोटींचा खर्च येतो. कोरोनामुळे राज्यात आर्थिक संकट असताना बदल्यांचा खर्च वाढविण्याची काय गरज होती?, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Protected Content