चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये आमदार प्रा. अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आमदार प्रा. अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला.
या विकासकामांमध्ये देवगाव ते पुनगाव या ४.६ किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा कामाचा समावेश असून, या रस्त्यामुळे परिसरातील नागरिक तसेच शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वटार येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामही मंजूर करण्यात आले असून, गावातील अंतर्गत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या कामाकडे पाहिले जात आहे.

सुटकार येथे अंगणवाडी इमारत बांधकाम, अडावद येथे अंगणवाडी बांधकाम, तसेच बिडगाव येथे शाळेची नवीन खोली बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील बालकांना तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
वडगाव येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. धानोरा येथे ट्रिमिक्स काँक्रीटचे कामही मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
यासोबतच वडगाव बु. ता. चोपडा येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. धानोरा ता. चोपडा येथे सामाजिक सभागृहाचेही लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांच्या विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत.
चोपडा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात रस्ते, शिक्षण, अंगणवाडी, सामाजिक सुविधा आणि ग्रामपंचायत स्तरावरील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी ही विकासकामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या या कामांमुळे संबंधित गावांतील नागरिकांच्या विविध मागण्यांची पूर्तता होण्यास मदत होणार आहे.



