नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना हद्दपारची नोटीस बजावण्यात आली आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मागील काळात गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींना मतदानाच्या दिवसापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये थांबायचे नाही, अशा नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र, हे सर्व मुद्दाम केले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे.
ऐन निवडणुकीतच्या अखेरच्या टप्प्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा येत असल्याने आता नाशिक लोकसभा मतदारसंघात याची चांगली चर्चा रंगली आहे. पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होत असल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या वतीने अशा प्रकारच्या नोटीसा देण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आमच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेपासून लांब ठेवण्यासाठीच अशा प्रकारे पोलिसांचा वापर करून नोटीसा पाठवण्यात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने शिवसेनेच्या तिकिटावर हेमंत गोडसे हे निवडणुकीला सामोरे जात आहे. तर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत नाशिक लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.