सातगावात डेंगू आजाराची लागण; परिसरात भिती

पाचोरा प्रतिनिधी । कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असतांना तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथे डेंगूचे दोन रूग्ण आढळल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील एका रुग्णास पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात तर दुसऱ्या रुग्णास औरंगाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पाचोरा तालुक्यातील मोठ्या गावांपैकी सातगाव (डोंगरी) हे एक आहे. मात्र येथे चांगल्या सुविधा नसल्याने ग्रामस्थ कमालीचे नाराज आहेत. वृद्ध महिला, पुरुष, लहान मुले यांना पावसाळ्यात चालतांना अक्षरशः कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरलेल्या असून, नळाचे पाणी रस्त्यावर येत असते. त्यामुळे रस्ते चिखलमय होतात. काही ठिकाणी पाण्याचे डबके असल्याने, आजाराची लागण होऊ शकते. आता मात्र डेंग्यूचे दोन रुग्ण निघाल्याने गाव भयभीत झाले आहे. आरोग्य विभागाने तात्काळ याची दखल घेऊन, तपासणी करावी. तसेच फवारणी करून डेंगू आजाराच्या साथीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर दोन दिवसात बंदोबस्त झाला नाही, तर वरिष्ठांना निवेदन देण्यात येईल असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.

 

Protected Content