
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील बालाजी हाईट्स येथे वॉचमन कडून रहिवाशी महिलेवर चाकूने वार करून हाताला दुखापत केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याबाबत दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात वॉचमनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील बालाजी हाईट्स या अपार्टमेंटमध्ये आरोही इंद्रकुमार ललवाणी वय ३८ या महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहेत. या अपार्टमेंटमध्ये गोकुळ हंसराज राठोड रा. सांगवी ता. चाळीसगाव हा वॉचमन म्हणून काम पाहतो. दरम्यान सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास वॉचमन गोकुळ राठोड हा महिलेच्या घरी आला आणि पाणी पाहिजे असे सांगितले. नंतर दिवाळी करण्यासाठी पैसे व वस्तूची मागणी करून लागला. दरम्यान माझे पती घरी नसल्याचे महिलेने सांगितल्यानंतर त्याने किचनमध्ये जावून चाकून हातात घेवून महिलेच्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर गोकुळ हा पसार झाला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुपारी ४ वाजता संशयित आरोपी गोकुळ हंसराज राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.



