पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमिवर शहरातील हातपंप सुरू करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, पारोळा नगरपरिषदेचे शहरात ३० ते ३५ हात पंप असून अनेक पंपांना मोठ्या प्रमाणात पाणी देखील आहे. मागील काळात नागरिकांनी या पंपाद्वारे काही प्रमाणात पाणीटंचाई वरती मात केलेली होती. आज मात्र नगरपालिका मुख्य अधिकारी व पाणीपुरवठा विभाग यांची इच्छाशक्ती कमी असल्याकारणाने पारोळा शहरातील नागरिकांना १५-१६ दिवसांत पाणी मिळत आहे. तर काही भागातील गोरगरीब नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भटकती करीत आहेत. पंधरा दिवसात पाणी येणारे पिण्याचे पाणी गोरगरीब नागरिक व सर्वसामान्य नागरिक किती प्रमाणात पाण्याची साठवण करू शकतील असा देखील मोठा प्रश्न पडतो.
गेल्या काही वर्षांपूर्वी नगरपालिकेचे सर्व हॅन्ड पंपाद्वारे भांडीकुंडी धुण्यासाठी पाणी गुरांना पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध होत होते. गेल्या पाच-सहा वर्षापासून नगरपरिषदेने हॅन्ड पंप कडे दुर्लक्ष केल्यामुळे काही पंप कात टाकत आहेत तर काही पंप दुरुस्तीची वाट देखील बघत आहेत. यावर्षी तर अगदी उन्हाळा एकदम कडक असल्याकारणाने सर्वसामान्यांची जीवाची लाही लाही होत आहे. परंतु नगरपालिका पंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.
अगदी कमी खर्चात दुरुस्त होणारी व स्वतःच्या हाताने पाणी उपलब्ध करून देणारी हॅन्ड पंप पाणी सेवा दुर्लक्षीत असल्याचे दिसून येत आहे. पारोळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण व पाणीपुरवठा इंजिनियर जैन मॅडम यांची इच्छा शक्ती हीच हॅन्ड पंप दुरुस्त करू शकते. कारण पारोळा नगरपरिषदेवर गेल्या दोन अडीच वर्षापासून प्रशासकीय राज सुरू आहे. यामुळे तात्काळ पंपांची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.