Home प्रशासन विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर QR Code सुविधा लागू करण्याची मागणी

विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर QR Code सुविधा लागू करण्याची मागणी

0
13

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर (Marriage Certificate) QR Code सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक सूरज परदेशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करत नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामांमध्ये होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांवर QR Code नसल्यामुळे अनेक शासकीय कार्यालयांमध्ये डिजिटल पडताळणी करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नवविवाहित जोडप्यांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती, विविध शासकीय योजना तसेच अन्य प्रशासकीय प्रक्रियांसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करताना विलंब आणि अडथळे निर्माण होत आहेत. बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये QR Code असलेल्या कागदपत्रांना प्राधान्य दिले जात असल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरही ही सुविधा उपलब्ध करून देणे काळाची गरज असल्याचे सूरज परदेशी यांनी निवेदनात नमूद केले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य सेवा संचालक तसेच संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून राज्यातील सर्व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांमधून QR Code युक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांनाही QR Code समाविष्ट असलेले सुधारित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने आवश्यक निर्देश द्यावेत, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना भविष्यातील डिजिटल पडताळणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या निवेदनावेळी शिवसेना शहर संघटक निलेश खाचणे, राकेश बोराखडे, भूषण परदेशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या जनहिताच्या मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्यास नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा सूरज परदेशी यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound