Home Cities अमळनेर महापुरुषांच्या अर्थसहाय्य योजनेत प्रताप हायस्कूलचा समावेश करण्याची मागणी

महापुरुषांच्या अर्थसहाय्य योजनेत प्रताप हायस्कूलचा समावेश करण्याची मागणी

0
59

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र शासनाने पर्यटन व सांस्कृतीक विभागांच्या मार्फत शिक्षण विभागाला महापुरुषांशी निगडीत शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. या योजनेत अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलचा देखील समावेश करावा, अशी मागणीचे निवेदन

अमळनेर तालुका मध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

जळगांव जिल्हयातील अमळनेर ही सानेगुरुजींची कर्मभूमी आहे. अमळनेर येथील प्रताप हायस्कुल मध्ये सानेगुरुजी शिक्षक होते. म्हणुनच अमळनेरला सानेगुरुजींची कर्मभूमी म्हणुन ओळखले जाते. याच कर्मभूमीतून “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” असा प्रेमाचा संदेश सानेगुरुजींनी दिला. तसेच “आता उठवू सारे रान, आता पेठवू सारे रान” असे आव्हान करीत खान्देश भूमीत क्रांतीची मशाल पेटविली होती. “बलसागर भारत होवो, विश्वास शोभूनी राहो” म्हणत युवकांना प्रेरणा दिली होती. त्यांच्या एका आव्हानाने १९४२ ला स्वातंत्र सैनिक उत्तमराव पाटील व लिलाताईंनी अमळनेरात देशातील सर्वात मोठे जळीतकांड घडवले होते. याच मातीतून त्यांनी कामगारांसाठी, देशासाठी लढा दिला होता. त्यांच्या विचारांचा पगडा आजही खान्देशच्या मातीवर आहे. “करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे” असा संदेश देवून त्यांना विद्यार्थ्यांचा लळा लागला होता.

महाराष्ट्र शासनाने पर्यटन व सांस्कृतीक विभागांच्या मार्फत शिक्षण विभागाला महापुरुषांशी निगडीत शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, नगर, नाशिक, आदि भागातील शाळांचा समावेश आहे. मात्र खान्देशातील एकही शाळेचा समावेश नाही. सानेगुरुजींसारख्या थोर स्वातंत्र सेनानी, आदर्श शिक्षक व महापुरुषाच्या निगडीत असलेल्या प्रताप हायस्कुल, अमळनेर जि.जळगांव या शाळेचा समावेश नसणे ही अन्याय कारक बाब आहे. म्हणून खान्देशचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रताप हायस्कुल अमळनेर जि.जळगांव या शाळेला देखील सांस्कृत व पर्यटन विभागातर्फे अर्थ सहाय्य मिळवी अशी मागणी अमळनेर तालुका शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound