केळी करपा रोगाच्या निर्मूलनासाठी पॅकेज मंजूर करावे : अमोल जावळे यांची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव  जिल्ह्यात केळी पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु सध्या पावसाचा दीर्घ खंड सोबतच उष्ण व आर्द्रतायुक्त हवामाना मुळे केळी पिकाच्या पिलबागा, कापणी वरील नवती बागांवर बुरशीजन्य सिगाटोका करप्याने विळखा घातला आहे. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक तसेच मानसिक संकटात सापडला आहे त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता करपा निर्मूलनासाठी पूर्वीचे पॅकेज पूर्ववत करून नवीन पॅकेज मंजूर करावे, यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी मुंबई येथे मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे.

यंदा प्रथमच करप्याची भीषण लाट उसळली आहे. जिल्ह्यातील सुमारे ४५ हेक्टर केळी बागांवर करप्याने विळखा घातला आहे. यात दोन – तीन महिन्यांच्या केळी बागांसह, निसवणीच्या अवस्थेत असलेल्या पिलबागा व कापणीवरील असलेल्या नवती बागांवर सुद्धा मोठयाप्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

करपा निर्मूलनासाठी गत दशकापूर्वी तत्कालिन खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे तगादा लावून ९५ कोटी रुपयांचे करपा निर्मूलन पॅकेज मिळवून कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना मोफत औषधे उपलब्ध करुन दिली होती. काही वर्षात त्यातील ३५ कोटी रुपये खर्ची पडल्यानंतर सद्य स्थितीत हे पॅकेज बंद आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता करपा निर्मुलनासाठी हे पॅकेज पुर्ववत करून नवीन पॅकेज मंजूर करावे अशी मागणी अमोल जावळे यांनी  कृषी मंत्री ना. धनंजय मुंढे यांना केली आहे.

शेतकऱ्याना पिक विम्याच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी , सिएमव्ही मुळे होणारे केळीचे नुकसान आणि विविध विषयावरही विस्तृत चर्चा या वेळी झाल्या.या संदर्भात लवकरच बैठक घेवून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल असे अश्वासन या प्रसंगी ना.धनंजय मुंढे यांनी अमोल जावळे यांना दिले आहे.

Protected Content