अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगर परिषदेत पाणीपुरवठा व्यवस्थेतील गैरप्रकार आणि जनरल मीटिंग प्रक्रियेतील अनियमितता या दोन गंभीर मुद्द्यांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या दुहेरी वादाची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी गांधली येथे तापी नदीवरील मुख्य पाईपलाईनवरून सुमारे १ इंच व्यासाची स्वतंत्र पाईपलाईन जोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही जोडणी शेतासाठी करण्यात आल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणी नगरसेवक आणि नगरसेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या निवेदनावेळी आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. नगरसेविका जयश्री पाटील, स्वप्ना पाटील, शोभाबाई गढरे, योगिता कापडणे यांच्यासह विजय पाटील, सचिन पाटील, कविता राजपूत, देवेंद्र कांबळे, अफसाना खाटीक, जुबेदाबी नसिरुद्दीन, प्रवीण पाटील, नंदा संदानशिव, सचिन कासार आणि भरतकुमार ललवाणी यांच्या सह्या निवेदनावर असल्याचे समजते.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कृती ही सार्वजनिक संपत्तीचा खाजगी वापर, पदाचा गैरवापर आणि नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले असून, महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 अंतर्गत संबंधितांवर अपात्रता आणि फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे नगर परिषदेत राजकीय वातावरणही तापले आहे.
दरम्यान, नगरपरिषदेच्या जनरल मीटिंग प्रक्रियेतही अनियमितता समोर आली आहे. नियमानुसार, सभेनंतर सात दिवसांच्या आत कार्यवृत्त तयार करून ते अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि कार्यालयाबाहेर जाहीर करणे आवश्यक असते. तसेच ३१ दिवसांच्या आत पुढील सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने डीपीओ कार्यालयामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सात दिवसांच्या आत सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. तसेच पाणीपुरवठा प्रकरणात स्वतंत्र चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घडामोडींमुळे अमळनेर नगर परिषदेच्या कामकाजातील पारदर्शकता, नियमपालन आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



