अमेठी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. काही ठिकाणचे निकाल थोड्या वेळात समोर येणार आहेत. सध्या देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे.
अमेठी मतदरासंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच स्मृती इराणी या पिछाडीवर होत्या तर काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे आघाडीवर होते. अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव झाला असून स्मृती इराणी यांच्या विजयाची हॅट्रिक किशोरी लाल शर्मांनी रोखली आहे.
काँग्रेसचे किशोरी लाल शर्मांनी यांनी स्मृती इराणी यांचा तब्बल १ लाख १८ हजार ४७१ मतांनी पराभव केला आहे. स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा अमेठी मतदरासंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. मात्र, यावेळी राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली. राहुल गांधी यांनी रायबरेली मधून तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवल्यामुळे अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. किशोरी लाल शर्मा यांनीच स्मृती इराणींच्या विजयाची हॅट्रिक रोखली आहे.