सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील शिवसेना दुभंगली असून सर्वच्या सर्व चार आमदार आणि पक्षाला पाठींबा दिलेले पाचवे आमदार या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे धाव घेतली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पदाधिकारी देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमिवर, अद्याप पर्यंत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्यांना बदलण्यात आले नव्हते. आता मात्र जिल्हातील पदाधिकारी बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे आधी असणारी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची धुरा आता माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्याकडे देण्यात आली आहे. दैनिक सामनामध्ये याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. राजपूत यांच्याकडे जामनेर, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. राजपूत हे शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी असून त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची महत्वाची जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे.