जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील दोन तरूणांचा आज अकस्मात मृत्यू झाला असून उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्षात तपासणी अहवाल आल्यानंतरच याबाबत माहिती स्पष्ट होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात आज दोन तरूणांचे अकस्मात मृत्यू झाले. यात यात पुणे येथील २८ वर्षीय गिरीश शालिक पाटील या तरुणाचा भुसावळ येथे तर भडगाव तालुक्यातील कजगाव येथील ३२ वर्षीय अक्षय रत्नाकर सोनार या तरुणाचा समावेश आहे. यातील गिरीश पाटील हे दोन दिवस उन्हात फिरल्याने उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. तर अक्षय रत्नाकर सोनार यांचा देखील अकस्मात मृत्यू झालेला आहे. दरम्यान, प्रशासनाने अद्याप हे दोन्ही जण उष्माघाताने मृत झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिलेली नाही. यासाठी मृताच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या भयंकर उष्णतेची लाट सुरू आहे. आधी चाळीसगाव तालुक्यातील इसम, अमळनेर व रावेरातील महिला तर यावल तालुक्यातील शेतकरी यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यानंतर आज दोन तरूणांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली असून सर्व जिल्ह्यात पुन्हा दोन संशयित उष्माघाताचे बळी गेले असून प्रशासनातर्फे मात्र अद्याप अहवाल येणे प्रलंबित असल्याने दोघांचाही मृत्यू उष्माघाताने की अन्य कारणांनी याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र वाढत्या तापमानामुळे अचानक दोन तरुणांचा मृत्यू ओढवल्याने उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.