कोलकाता-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी नेताजींचे पार्थिव अवशेष 18 ऑगस्टपर्यंत जपानमधील रेन्कोजी येथून परत आणण्याचे आवाहन केले.
एका मुलाखतीत ते म्हणाले, नेताजींच्या मृत्यूशी संबंधित वृत्तांच्या आधारे सरकारने अंतिम निवेदन जारी करावे, जेणेकरून त्यांच्याबद्दलच्या खोट्या अफवांना आळा बसेल अशी माझी इच्छा आहे.चंद्र कुमार बोस यांनी पुढाकार घेऊन मोदी सरकारला नेताजींच्या मृत्यूच्या तपासाशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करण्यास सांगितल्या. ते म्हणाले की, १० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तपासानंतर हे स्पष्ट झाले आहे की नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमध्ये झालेल्या विमान अपघातात झाला होता. म्हणून, भारत सरकारने अंतिम विधान जारी करणे महत्वाचे आहे, जेणेकरून खोट्या अफवा आणि कहाण्यांना आळा बसेल.
पश्चिम बंगाल भाजपचे माजी उपाध्यक्ष चंद्र कुमार म्हणाले की, नेताजींना स्वातंत्र्यानंतर भारतात परतायचे होते. गोपनीय फाईल्स आणि कागदपत्रांवरून नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नेताजींचे अवशेष रेनकोजी मंदिरात ठेवण्यात आले हे अत्यंत अपमानास्पद असल्याचे बोस म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही गेल्या साडेतीन वर्षांपासून पंतप्रधानांना पत्र लिहित आहोत की, भारताच्या मुक्तीकर्त्याला आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे अवशेष भारतीय भूमीत यावेत.