भुसावळ प्रतिनिधी । भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या बहुतांश जाहिराती आणि लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर भाजपचे चिन्ह कमळ तसेच जिल्हा नेते गिरीश महाजन यांना स्थान देण्यात न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या जाहिराती दिल्या असून यासोबत भुसावळ तालुक्यात बरेचसे फलक देखील लावण्यात आलेले आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे बर्याच फलकांवर माजी मंत्री तथा अलीकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मातब्बर नेते एकनाथराव खडसे यांचे छायाचित्र आहे. काही फलकांवर खासदार रक्षा खडसे व राजूमामा भोळे यांचे देखील छायाचित्र आहे. तथापि, भाजपचे चिन्ह कमळ, पक्षाचे जिल्हा नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांना मात्र स्थान देण्यात आलेले नाही.
संजय सावकारे हे एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. खरं तर ते २००९ साली संतोष चौधरी यांच्या पाठबळाने राष्ट्रवादीच्या तिकिटावर भुसावळातून निवडून आले होेते. दरम्यान, संतोष चौधरी हे फौजदारी खटल्यात अडकल्यानंतर चौधरी व सावकारे यांच्यात दुरावा वाढला. व ते नाथाभाऊंच्या सोबत आले. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय संपादन केला आहे. मध्यंतरी खडसे हे अडचणीत आले असतांना संजय सावकारे हे त्यांच्या सोबत उभे राहिले असल्याचे दिसून आले होते. परिणामी ते सुध्दा राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. तथापि, पोटनिवडणूक टाळण्यासाठी ते पुढील निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करतील असे मानले जात आहे. या आधीच वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांनी भाजप व विशेष करून गिरीश महाजन यांच्यासोबतचे मतभेद स्पष्टपणे उघड करून आपले इरादे स्पष्ट केल्याचे मानले जात आहे.