विवाहितेस मारहाण करून सासर मंडळीने विहिरीत फेकलेल्या महिलेचा मृत्यू

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रुई (ता. निफाड) येथील माहेर व कोळवाडी (ता. निफाड) येथील सासर असलेल्या विवाहितेस सासरच्या मंडळींनी मारहाण करून विहिरीत फेकले. मात्र, दीड महिन्यापासून उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याबाबत सासरच्या मंडळीविरोधात निफाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक बाळकृष्ण तासकर (वय ६१) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की भारत पापळ, विलास पापळ, दत्तात्रय पापळ (सर्व रा. कोळवाडी) यांनी संगनमत करून मुलगी दीपाली भारत पापळ (वय ३०) हिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तिला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून उपाशी ठेवले. दीपाली व भरत यांना प्रियंका (वय ७) सार्थक (वय ६) असे दोन अपत्य असून, भारतला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो वेळोवेळी पैशांची मागणी करत असे. दिवाळीपूर्वी पैशासाठी त्यांनी तिला माहेरी पाठविले होते.

त्यांना वेळोवेळी दीड लाखाच्या आसपास पैसेही दिले. मात्र, ननंद आशा व अनिता माहेरी आल्यावर त्यांच्या सांगण्यावरून तो तिला मारहाण करत असे. दिपाली २८ डिसेंबर २०२३ ला रात्री आठच्या सुमारास नवरा भारत पापळ, सासरा विलास पापळ, सासू मंदाबाई पापळ, दीर दत्तात्रय पापळ यांनी तिला काठी व हाताबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या शेतातील विहिरीत टाकून दिले.

त्यानंतर तिला निफाड येथील खासगी व त्यानंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दीपा‌ली बेशुद्ध होती. तिच्या अंगावर मारहाणीच्या खूणा होत्या. मुलगी दीपालीचा ५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. या फिर्यादीवरून भारत पापळ, विलास पापळ, मंजाबाई पापळ, दत्तात्पापळ, नणंद आशाताई नंदू शिंदे (रा. चांदोरी), अनिता धनंजय जगताप (रा. सोमठाणे) यांच्याविरुद्ध निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

दरम्यान, मंगळवारी दुपारी मृत दीपालीवर प्रचंड तणावपूर्ण वातावरणात कोळवाडी येथे तिच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस उपउधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या, लासलगाव, निफाड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content