Home आरोग्य डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांसमोर केले जलनेतीचे थेट प्रात्यक्षिक 

डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांसमोर केले जलनेतीचे थेट प्रात्यक्षिक 

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव खुर्द येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना आयुर्वेद आणि योगशास्त्रातील शास्त्रोक्त आरोग्य संवर्धन पद्धतींची माहिती देण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रतिश्याय म्हणजेच नाक वाहणे, शिंक येणे आणि नाक बंद होणे यासारख्या समस्यांवरील चर्चेदरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांसमोर जलनेती या योगशास्त्रातील शुद्धीकरण क्रियेचे थेट प्रात्यक्षिक करून दाखविले.

यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ. कोमल पाटील आणि योग प्रशिक्षक चैतन्य शिरसागर यांनी प्रतिश्याय, अ‍ॅलर्जिक राइनायटिस, सायनसच्या समस्या तसेच वारंवार होणाऱ्या सर्दीमध्ये जलनेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हर्षल बोरोले यांनी स्वतः जलनेतीची प्रक्रिया करून दाखवत या क्रियेची योग्य पद्धत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले.

मार्गदर्शन करताना डॉ. कोमल पाटील यांनी सांगितले की, जलनेतीमुळे नासामार्ग स्वच्छ राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रतिश्याय, अ‍ॅलर्जी आणि सायनसशी संबंधित त्रास कमी होण्यास सहाय्य मिळू शकते. नियमित आणि योग्य पद्धतीने केलेली ही योगक्रिया श्वसन आरोग्यासाठी उपयुक्त ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. योग प्रशिक्षक चैतन्य शिरसागर यांनी जलनेती करण्याची शास्त्रोक्त पद्धत, त्यासाठी आवश्यक असलेल्या खबरदारीच्या बाबी आणि जलनेतीनंतर करावयाच्या योगक्रियांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ही क्रिया करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि योग्य पद्धतीचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जलनेतीमुळे नाकातील धूळ, प्रदूषणाचे सूक्ष्म कण आणि अतिरिक्त कफ दूर होण्यास मदत होते. तसेच श्वसनक्रिया सुधारण्यास, सायनसच्या तक्रारी कमी करण्यास आणि मानसिक ताजेपणा व एकाग्रता वाढविण्यास सहाय्य मिळते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.याप्रसंगी डॉ. हर्षल बोरोले यांनी आयुर्वेद आणि योगशास्त्रातील दैनंदिन आरोग्य संवर्धनाच्या पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. निरोगी जीवनशैलीसाठी आधुनिक उपचारांसोबतच आयुर्वेद आणि योगातील शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयुर्वेद आणि योगशास्त्राच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून महत्त्वपूर्ण ज्ञान मिळाले. डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित जलनेती प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक आरोग्य पद्धतींचे महत्त्व समजावून देण्यात आले. डीन डॉ. हर्षल बोरोले यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम प्रभावी ठरला.


Protected Content

Play sound