जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे हे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची पूर्वीची अंतिम मुदत १५ एप्रिल होती. त्यांची आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

( Image Credit Source : Twitter )
परंतु, देविदास कुलाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आपले सरकार’ सेवा पोर्टल १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत नियमित देखभालीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी आता २१ एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामुळे क्रीडा कोट्यातून गुण सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. ज्यांना १५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही, ते आता २१ एप्रिलपर्यंत आपले अर्ज सादर करू शकणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.