चाळीसगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळच असणार्या महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळच्या पुलाखाली अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून जवळच असलेल्या छोट्या पुलाखाली आज सायंकाळी कुजलेल्या अवस्थेतील पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम कडलक, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मुलगीर व पोलिस पथक दाखल झाले असून मृतदेहाची पाहणी करून घटनास्थळावर शवविच्छेदन करण्यात येत आहे. दरम्यान, हा मृतदेह नेमका कुणाचा याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर एका बालकाचा मृतदेह आढळून आला होता. विशेष बाब म्हणजे यातील आरोपींची माहिती देण्यासाठी एक लाखांचे बक्षीस जाहीर झालेले असतांना याचा तपास अद्यापही लागलेला नाही. यातच आता हा मृतदेह आढळून आल्याने या दोन्ही घटनांमध्ये काही समान दुवा आहे का ? याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.