भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा एकदा गोंधळात तहकूब करण्यात आली असून सत्ताधारी व विरोधकांमधील वाद कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. अपेक्षित तोडगा न निघाल्याने सलग तिसऱ्यांदा सभा सुरळीत पार पडू शकली नाही.
भुसावळ पालिकेची तिसरी सर्वसाधारण सभा आज तणावात पार पडली. ही सभा वादळी होणार असल्याचे गृहीत धरून पोलिस प्रशासनाने पालिकेच्या परिसराला छावणीचे स्वरुप दिले व प्रवेशद्वारातून केवळ नगरसेवक पालिका सभेशी संबंधितानाच प्रवेश देण्यात आला. सभा सुरू झाल्यानंतर अधिकृत प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी सभागृहात दाखल झाल्यानंतर त्यांना पालिका प्रशासनाच्या अभियंत्यांने नगराध्यक्षांच्या सूचनेवरून सभागृहात बसण्यास मनाई केल्याचे जाहीर केल्यानंतर माध्यमांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करीत सभागृह सोडले. सभागृहात व्यासपीठावर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, गटनेता सचिन चौधरी आदींची उपस्थिती होती.

सभेला सुरूवात होताच भाजपा पदाधिकार्यांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी सत्ताधारी नगरसेविकेने यास विरोध केल्यानंतर आधी महिलांमध्ये व नंतर पुरूष नगरसेवकांमध्ये शाब्दीक वादाला वाढण्यास सुरूवात झाली. यावेळी विरोधातील भाजपा नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवक समोरा-समोर आल्यानंतर शाब्दीक वादामुळे गोंधळ अधिकच वाढून सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती अधिक गोंधळाची झाल्यानंतर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी दालन सोडले व त्यानंतर राष्ट्रवादीचे सत्ताधारीही सभागृहाबाहेर पडले.
यापूर्वी तहकूब झालेली सभा किमान आज मंगळवारी तरी सुरळीत चालेल, अशी अपेक्षा होती मात्र तीही फोल ठरली. भाजपा नगरसेवक नगराध्यक्ष भंगाळे यांना निवेदन देण्यावर ठाम असल्याने त्यावरून गोंधळ अधिक वाढला व सत्ताधार्यांनी दालन सोडल्यानंतर गोंधळ पुन्हा वाढला. यावेळी भाजपा नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांनी सभा चालवावी, असा आग्रह धरला मात्र हा प्रयत्न असफल ठरला. यावेळी मुख्याधिकार्यांना नगरसेवकांनी किती वेळा सभा तहकूब करण्याचा नियम आहे? असा प्रश्न केला मात्र त्यांना उत्तर देता आले नाही. यावेळी सत्ताधार्यांनी पालिकेच्या दर्शनी भागावरील फलकावर सोमवार, 23 मार्च रोजी दुपारी चार वाजता सभा होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता सोमवार, 23 मार्च रोजी दुपारी चार वाजता तिसर्यांदा सभा होत असून ही सभा तरी सुरळीत होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, भुसावळ पालिकेच्या सभागृहात प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी गेल्यानंतर त्यांना प्रवेश नसल्याचे कारण देण्यात आले शिवाय ही सूचना नगराध्यक्षांनी केल्याचे पालिका अभियंत्याने माईकमधून सांगितल्याने माध्यमांनी नाराजी व्यक्त करीत दालन सोडले. हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या स्तंभावरच एक प्रकारचा आघात असल्याची भावना शहरातील पत्रकार संघटनांनी व्यक्त करीत घडल्या प्रकारा विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.



