जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जळगाव जिल्ह्याची केळीच्या माध्यमातून संपूर्ण जगात ओळख निर्माण झालेली आहे. जगातील केळी उत्पादनात एकट्या जळगाव जिल्ह्याचा ३ टक्के इतका सिंहाचा वाटा आहे. केळीची महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकिटाचे (विशेष इव्हलपचे) प्रकाशन सुद्धा या प्रदर्शनातच अशोक जैन व मान्यवरांच्याहस्ते करण्यात येत आहे.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या साजरे होत आहे. या काळातच जागतिक टपाल दिनानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ‘डाक टिकटों में महात्मा’ हे माहितीपूर्ण, रंजक प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास बी. व्ही.चव्हाण (अधीक्षक, टपाल विभाग, जळगाव), जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदलवाडीचे शशांक पाटील, त्याच प्रमाणे जैन टिश्यू कल्चरचे वरिष्ठ अधिकारी व प्रगतीशील शेतकरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.