यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्या वारकऱ्यांची पारंपरिक दिंडी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात काढण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने आणि अभंग-भजनांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाची सुरुवात व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र महाजन यांच्या हस्ते विठुरायाच्या पूजनाने झाली. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील, शिक्षक पंकज पाटील, शिसोदे, सोनाली चौधरी, सोनाली साळुंखे, विमल बारेला, रामेश्वरी बडगुजर तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य कैलास पाटील, तुषार माळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी चिमुकल्या वारकऱ्यांच्या दिंडीची शोभा वाढवत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. विठ्ठलाच्या नामस्मरणाने परिसर दुमदुमून गेला. गावातील प्रमुख चौकात शिक्षिका रामेश्वरी बडगुजर यांनी संत जनाबाई यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करत आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी संत जनाबाई यांच्या “गोवऱ्या” या प्रसंगावर आधारित नाटिका सादर केली. तसेच भावगीतावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. मुख्याध्यापक विजय पाटील, पंकज पाटील, सोनाली महाजन आणि रामेश्वरी बडगुजर यांनी विद्यार्थ्यांसोबत फुगडी खेळत आनंदोत्सवात सहभाग घेतला.
गावातील भजनी मंडळीच्या सहकार्यामुळे दिंडी अधिकच भक्तिमय झाली. विठुरायाच्या अखंड नामस्मरणात पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि भारतीय संस्कारांची जपणूक करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.



