यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा माजी सरपंच विलास नारायण अडकमोल यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका ठेकेदाराविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास नारायण अडकमोल (वय ३६, व्यवसाय-शेती, रा. कोरपावली, ता. यावल) यांनी प्रविण विठ्ठल सूर्यवंशी (वय ३३, रा. कोळवद/विरासनगर, ता. यावल) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संबंधित आरोपी हा विविध शासकीय विकासकामांचे ठेके घेणारा ठेकेदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, २३ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कोरपावली ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या ई-टेंडर फाईलसंदर्भात चर्चा करण्यासाठी विलास अडकमोल हे त्यांच्या दोन मित्रांसह यावल शहरातील कृष्णानगर परिसरातील आरोपीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी कार्यालयाबाहेरील सार्वजनिक ठिकाणी आरोपीने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली, जिवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन भय निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर भीतीपोटी तात्काळ तक्रार दाखल करता आली नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. दरम्यान, आरोपीने स्वतः फिर्यादीविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समजल्यानंतर विलास अडकमोल यांनी २४ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरुद्ध अधिकृत तक्रार दिली.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.



